कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे देशभरात मद्यविक्रीलाही बंदी होती. परंतु केंद्र सरकारने काही नियम शिथिल करत दारू विक्रीला कालपासून परवानगी दिली आहे. अशात उत्तर प्रदेशात उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी १०० कोटी पेक्षा जास्त रक्कमेची दारू विक्री झाली आहे. ही दारु विक्री केवळ नऊ तासात झाली आहे.
राज्यात 4 मे रोजी लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यात आली. ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोननुसार आणि नियमांचे पालन करत दारूची दुकानं उघडण्यात आली होती. तब्बल दीड महिन्यानंतर दारूची दुकानं उघडल्यामुळे तळीरामांची एकच झुंबड उडाली होती. ठिकठिकाणी वाईन शॉप्सवर तळीरामांच्या रांगाच्या रांगा पाहण्यास मिळाल्या होत्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एका दिवसात 10 ते 11 कोटींचा महसूल जमा झाला आहे. मुंबईत दारुची दुकाने उघडायला परवानगी द्यायची की, नाही या गोंधळातच काही तास वाया गेले. अखेर उशिराने आदेश आला. बहुतांश मालकांनी मंगळवारी सकाळी दुकान उघडायचे ठरवले आहे. सोलापूर शहर आणि औरंगाबादमध्ये जिल्हा प्रशासनाने दुकाने उघडण्याची परवानगी दिली नाही.