प्रासंगिक- दसरा : परंपरा, इतिहास आणि महत्त्व


img

 

दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. सणानिमित्त नवीन कपडे खरेदी केले जातात; तसेच सोने-चांदीही खरेदी केली जाते. घराला आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांचे तोरणे लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्र, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.

हिंदूंचा एक प्रमुख सण आणि शुभ दिवस. आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत देवीचे नवरात्र असते. याची समाप्ती या दिवशी होते. शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासूर या राक्षसांना मारण्यासाठी दुर्गेने चंडीचा अवतार घेतला आणि नऊ दिवस या राक्षसांबरोबर युद्ध केले.

दशमीला महिषासुराचा तिने वध करून अंतिम विजय संपादन केला, म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करतात. आश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी आकाशात तारका दिसू लागताच विजय नावाचा मुहूर्त असतो व त्यावेळी जे काम हाती घ्यावे त्यात यश मिळते, असे पुराणात सांगितले आहे. चैत्र पाडवा (चैत्र शुद्ध प्रतिपदा), अक्षय्य तृतीया (वैशाख शुद्ध तृतीया), विजयादशमी व दिवाळीचा पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा, अर्धा मुहूर्त) या हिंदूंच्या साडेतीन विशेष शुभ मुहूर्तातील हा एक आहे.

या दिवशी शमी किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करतात. शमी वृक्षाजवळच भूमीवर अपराजिता देवीची मूर्ती रेखाटून तिचीही पूजा करतात. रावणाचा वध करण्यासाठी रामाने याच दिवशी शमीचे पूजन करून प्रस्थान ठेवले. अर्जुनाने अज्ञातवास संपवून याच दिवशी शमीचे पूजन केले व आपली शस्त्रे पुन्हा हातात घेतली.

हा विजयोत्सव असल्याने राजांनी आपल्या घोड्यांना सुशोभित अलंकार घालावे, निराजन नावाचा विधी करावा, शस्त्रास्त्रांचे पूजन करावे व विजयासाठी प्रस्थान करावे असे सांगितले आहे. कौत्सास चौदा कोटी सुवर्णमुद्रा देण्यासाठी रघुराजाने कुबेरावर स्वारी केली. त्यामुळे भयग्रस्त होऊन कुबेराने याच दिवशी शमीच्या झाडावर सुवर्णवृष्टी केली.

आवश्यक तेवढे सोने रघुराजाने कौत्सास देऊन बाकीचे त्याने नागरिकांना वाटले अशी कथा स्कंदपुराणात आहे. या दिवशी सोने लुटण्याच्या प्रथेचा संबंध या कथेशी आहे. साधारणपणे त्रेतायुगापासुन साजरा केला जाणारा विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण असून या सणाला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे.

आश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी. असे म्हणतात की, याच दिवशी भगवान रामाचा पूर्वज रघू या आयोध्याधीश राजाने विश्वजित यज्ञ केला होता. त्या काळापासून म्हणजे त्रेतायुगापासून हिंदू लोक विजयादशमी महोत्सव साजरा करतात.

दसऱ्याला असते या गोष्टींना महत्त्व

शमी

दसऱ्याला शमी वृक्ष पूजनाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी संध्याकाळी शमी वृक्षपूजन केल्याने आरोग्य व धन संपत्ती प्राप्त होते अशी मान्यता आहे.

आपट्यांची पाने

या वृक्षाला अश्मंतक असेही म्हणतात. आपट्याची पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहेत. विजयादशमीला आपट्यांची पाने एकमेकांना दिली जातात. यालाच सोने लुटणे असेही म्हणतात. `दसरा’ हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत असत.नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या ताटात नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्या्च्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात.ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त् करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला. याच दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता व तेव्हापासून हा दिवस विजयोत्सव अर्थात विजयादशमी म्हणून म्हणजेच दसरा म्हणून साजरा केला जातो. विजयाची प्रेरणा देणारा हा सण आहे.

दसऱ्याला शास्त्र आणि शस्त्र पूजन

विजयादशमीला शस्त्र आणि शास्त्र पूजन करण्याविषयी वेगवेगळे महत्त्व आहे. प्राचीन काळापासून क्षत्रिय युद्धाला जाण्यासाठी या दसरा या दिवसाची निवड करत होते. त्यांचे मानणे असे होते की, दसर्यासच्या दिवशी केलेल्या युद्धात निश्चितच विजय मिळतो. क्षत्रियांप्रमाणे ब्राह्मण लोकही दसरा या दिवशी विद्या ग्रहण करण्यासाठी घराबाहेर पडत. तसेच व्यापारी लोक विजयादशमीच्या या पवित्र दिवशी नवीन दुकान, शोरूम इत्यादींचा शुभारंभ करणे शुभ मानतात.दसऱ्याला शमी वृक्ष पूजनाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी संध्याकाळी शमी वृक्षपूजन केल्याने आरोग्य व धन संपत्ती प्राप्त होते अशी मान्यता आहे.


लोकांच्या प्रतिक्रिया


theideasplanet.com site व page ला फाॅलो/लाईक व कमेंट्न्स करा. काळजी घ्या, सुरक्षित राहा...